Thursday, February 25, 2010
भाषांतरकला – करिअरच्या नविन वाटा
भाषांतरकला – करिअरच्या नविन वाटा
एका भाषेतला मजकूर नेमकेपणाने दुसऱ्या भाषेत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद. भाषांतरप्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा म्हणतात आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात. चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण आणि आकलन असावं. त्याचा दोन्ही भाषांचा अभ्यास सखोल असावा लागतो. यामध्ये केवळ साहित्याचा अभ्यासच नव्हे तर व्याकरणाचंही ज्ञान त्याला असावं लागतं. तसंच ती भाषा बोलणाऱ्या समूहाची किंवा समाजाची सांस्कृतिक जाण असायला पाहिजे. याचबरोबर तो अनुवादक सृजनक्षम असावा लागतो.
अनुवाद म्हणजे केवळ ललित साहित्यकृतींचा अनुवाद नाही. हे क्षेत्र विस्तृत आहे आणि आज साहित्याबरोबरच इतरही अनेक क्षेत्रांमध्ये भाषांतराची गरज निर्माण झाली आहे. ग्लोबलायझेशनमुळे इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढलेे. सर्व अद्ययावत माहिती इंग्रजी भाषेमध्ये असल्यामुळे इंग्रजीला जगाची ज्ञानभाषा म्हणतात. स्वभाषेलाच महत्त्व देणाऱ्या प्रगत राष्ट्रांमध्ये त्यांच्या त्यांच्या भाषांमध्ये लेखन होेतं.
भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे इथे प्रांतिक भाषेत अनुवाद होतात. अनुवादाला पर्यायाने अनुवादकांना महत्त्व प्राप्त झालं. महाराष्ट्रापुरते बोलायचं तर सरकारने या अनुवाद कार्यासाठी स्वतंत्र भाषा संचालनालय निर्माण केले. भाषा सल्लागार मंडळाची स्थापना केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमधून प्रशासनिक मराठी भाषेचा विकास झालेला आहे हे सर्वज्ञात आहे. आज सरकारच्या सर्व व्यवहारात, विधान मंडळाच्या कामकाजात सर्वत्र मराठीचा वापर होतो. त्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व असणाऱ्या आणि मराठी भाषेचा पदव्युत्तर अभ्यास केलेल्या मुलामुलींना भाषा संचलनालय, विधान मंडळ इत्यादी ठिकाणी अनुवादक म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
सरकारी व्यवहाराप्रमाणे न्यायव्यवहारातही राजभाषा मराठीचा वापर अनिवार्य झाल्यामुळे न्यायव्यवहार क्षेत्रांमध्ये-न्यायालयांमध्ये-अनुवादकांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झालेली आहे. इथे केवळ मराठीमध्ये अनुवाद करणाऱ्या अनुवादकांचीच नाही तर मराठीतून किंवा अन्य भारतीय भाषांमधून इंग्रजीमध्ये अनुवाद करणाऱ्या अनुवादकांचीही गरज आहे. तसंच नोकरी न करता स्वतंत्रपणे हे काम करूनही अर्थार्जन करता येईल.
वृत्तपत्रे, नियतकालिके, रेडिओ, दूरदर्शन यांसारख्या प्रसारमाध्यमांमध्येही अनुवादकांची सातत्याने निकड भासत असते. जाहिरातक्षेत्रही झपाट्याने विकसित होत असल्याने या क्षेत्रात अनुवादकांची सातत्याने गरज वाढतेय. याव्यतिरिक्त विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यक इत्यादींसारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्षेत्रांमध्येही अनुवादकांची गरज असते. इंग्रजीमधून सातत्याने प्रस्तृत होणारे अद्ययावत ज्ञान मराठी भाषेमध्ये किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषेमध्ये आणणे हे अतिशय अवघड काम आहे. अभ्यासू अनुवादकांची या क्षेत्रात खूप गरज आहे.
वैज्ञानिक आणि तांत्रिक विषयांचे लेखन, कायद्याचे लेखन हे परिभाषानिष्ठ लेखन असते. त्यामुळे अशा प्रकारच्या लेखनाचा अनुवाद करण्यासाठी अनुवादकाकडे त्या त्या विषयाच्या परिभाषेचे ज्ञान असणं तसंच वेळप्रसंगी गरज पडल्यास परिभाषिक शब्द तयार करण्याची क्षमता असायला हवी. कारण अशा प्रकारच्या लेखनात परिभाषेचा अचूक वापर करावा लागतो, विचार नि:संदिग्धपणे मांडावे लागतात. वाक्ये सुटसुटीत लिहून अनावश्यक क्लिष्टता, बोजडपणा टाळावा लागतो. प्रशिक्षणाने आणि नंतर अनुवादकाच्या व्यक्तिगत अभ्यासाने, सरावाने हे जमू लागते.
भाषांतर ही कला आहे तसंच त्याचं शास्त्र आणि तंत्रही आहे. सृजनशीलता आणि अभ्यास यांच्या योगाने या क्षेत्रात यश मिळवता येतं. सुयोग्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून अनुवादकांना प्रशिक्षण दिल्यास अनुवाद प्रशिक्षक म्हणूनही यशस्वी व्यवसाय करणं शक्य आहे.
दळणवळणाच्या साधनांनी जसे जगातले अंतर दिवसेंदिवस कमीकमी होतंय, तसं भाषांतरामुळे जग जवळ येतंय. आज अनुवादाचं महत्त्व सगळ्यांना पटलंय. त्यामुळे या क्षेत्रात अर्थार्जनाच्या आणि स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करण्याच्या संधी निर्माण होत आहेत. त्यांचा सुजाणपणे विचार करायला हवा.
निवृत्त सहाय्यक भाषा संचालक, भाषा संचालनालय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment