ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती आई असावी तर जिजाऊ सारखी! मला उद्याचा बदल हवा आहे. का आपन भरकटतोय ? call 09595481717 "माझ स्वप्न-माझ ध्येय!! जिजाऊ- घरा घरात जिजाऊ !Call:9595481717" Home राजमाताजिजाऊ शिवाजीराजे संभाजीराजे मराठाआरक्षण आण्णासाहेब चौधरी नौकरी: सौजन्य महान्यूज

Saturday, October 31, 2009

जगाची भाषा (?) आणि आपण

जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)
प्रिय स्वाभिमानी मराठी बांधवांनो,

जगाची भाषा इंग्रजी असल्यामुळे आपण इंग्रजी शिकलो नाही तर जगातच नव्हे तर देशात, राज्यातही आजच्या स्पर्धायुगात मागे पडू अशी आपल्याला भीती असते. पण इंग्रजी खरोखरच संपूर्ण जगाची भाषा आहे का?


श्री० सुधन्वा बेंडाळे यांनी ’समर्थ मराठी संस्थे’च्या ’कोहिनूर’च्या २००७ सालच्या वार्षिक अंकात लिहिलेला लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे तो पहा.

जगाची भाषा आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)

विविध संस्थांनी केलेल्या आपापल्या पाहणीनुसार आणि प्रत्येक भाषेत कुठल्या बोली भाषा समाविष्ट करतात यानुसार इंग्रजी भाषा जगात दुसरी, तिसरी किंवा चौथी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा समजली जाते. मात्र भाषक-संख्या हाच निकष लावायचा असल्यास एकच भाषा निर्वादितपणे ’जगाची भाषा’ ठरू शकते आणि ती म्हणजे चिनी (मॅंडॅरिन) हीच भाषा. पण ते कोणी मान्य करणार नाही.

इंग्रजी किंवा इतर भाषा आवश्यकतेप्रमाणे जरूर शिकाव्या, त्यांवर प्रभुत्वही मिळवावे. पण ते ज्ञान लवकरात लवकर मातृभाषेत आणावे. म्हणजे इतर मराठी समाजाला त्याचा फायदा होईल. मातृभाषेतील शिक्षणाला पर्यायच असू शकत नाही हे जगभरातील विद्वान व भाषातज्ञ सांगतात. भारतातील अनेक तज्ञांनीही आतापर्यंत तेच सांगितले. हल्लीच्या ‘इंडिया’मधील made in USA असलेले तज्ज्ञ मात्र याला अपवाद आहेत.

साध्य आणि साधन या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. आपण त्यात गल्लत करता कामा नये. ज्ञान हे आपले साध्य असते आणि ते मिळवण्यासाठी भाषा हे साधन असते. ज्ञान हे इंग्रजी, जर्मन, जपानी, संस्कृत, बंगाली, हिंदी आणि आपली मातृभाषा अशा कुठल्याही भाषेत मिळवता येते. पण भारतात आपण “केवळ इंग्रजी भाषा म्हणजेच ज्ञान” अशी गल्लत करतो. इंग्रजी शिकलो नाही तर आपल्याला ज्ञान मिळवण्याची सुतराम शक्यता नाही असा आपण ग्रह करून घेतलेला आहे. खरं म्हणजे, आपल्या भारतीय भाषा सक्षम केल्या तर मराठी समाजाला आपण बरेचसे शिक्षण आपल्या भाषांमध्ये नक्कीच देऊ शकतो. आपल्या भाषा शासनव्यवस्था, संवादभाषा, माहितीभाषा या सर्वांसाठी आवश्यकतेप्रमाणे विकसित करू शकतो. स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड निग्रहाने बाजुला सारून इंग्रजांनी आपली गावठी आणि असंस्कृत समजली भाषा समृद्ध करून इतक्या प्रगत आणि मानाच्या स्थानाला आणून ठेवली; इतरही अनेक राष्ट्रांनी आपापल्या भाषांची आधुनिक काळात प्रगती केली. तसे भारतीयांना का शक्य होणार नाही?

युरोप, आशिया, आफ्रिका, अमेरिका, अशा विविध खंडात असे अनेक प्रगत-अप्रगत देश आहेत की ज्यामध्ये इंग्रजी ही भाषा फारशी माहित नसते. जपानमध्ये शिक्षण, शासनव्यवस्था, उद्योगधंदे, संशोधन या पैकी कुठल्याही क्षेत्रात इंग्रजीला फारसे स्थान नाही. बेंडाळेंच्या प्रस्तुत लेखात सुचविल्याप्रमाणे जपानमध्ये मुख्यतः दुभाषेमंडळी परकीय भाषा शिकतात, कारण केवळ त्यांचाच व्यवसाय मुख्यत्वेकरून त्यांच्यावर अवलंबून आहे. जपानमध्ये इतर कोणाचेही अंतर्गत व्यवहारात इंग्रजीवाचून अडत नाही. उलट जपानशी व्यवहार-उद्योग करायचा तर इतर देशांना त्यांच्या भाषेत संपर्क साधायला लागतो. जपानी भाषेत नसणार्‍या संस्थळांकडे जपानमधील जनता फारसे लक्षच देत नाही. जपानमधील उच्चशिक्षणच नव्हे तर संशोधनही इंग्रजीच्या कुबड्यांशिवाय चालते. जपानमधील ज्या तज्ज्ञांनी नोबेल पारितोषके मिळवली त्यांनी आपले संशोधन आपल्या भाषेतच केले !

तसेच इस्रायलचे उदाहरण घेऊ. त्या देशाला भारतानंतर ९ महिन्यांनी स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी हिब्रू भाषा ही जवळजवळ मृतवत्‌ झालेली भाषा होती. ज्यू लोक जगभर विखुरलेले होते आणि त्यांनी त्या-त्या ठिकाणची स्थानिक भाषा तसेच संस्कृतीसुद्धा आपलीशी केली होती. महाराष्ट्रातही बरेच ज्यू (बेणे इस्रायली) होते. कोकणातील रायगड (पूर्वीचा कुलाबा) जिल्हा इथे बर्‍याच ज्यूं लोकांची वस्ती होती. चौलकर, पेणकर, रेवदणकर अशी त्यांची गावावरून आडनावे होती. त्यांची संस्कृती, रूढी, रीतिरिवाज, हे सर्व मराठी संस्कृतीत पूर्णतः मिसळलेले होते. मराठी हीच त्यांची मातृभाषा होती. अशा प्रकारे जगभरचे ज्यू इस्रायलच्या निर्मितीनंतर एकत्र आले; पण त्यातील अनेकांना हिब्रू भाषेची तोंडओळखही नव्हती. हिब्रूची शब्दसंख्याही फार मर्यादित होती. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर भाषेची प्रगल्भता आणि संपन्नता या दोन्ही दृष्टींनी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती असूनही स्वाभिमानपूर्वक इस्रायलमध्ये हिब्रू हीच देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून तिची वेगाने एवढी प्रगती केली की त्या भाषेत शिक्षण घेऊन शिकलेल्या संशोधकांच्या द्वारा इस्रायलमध्ये भारतापेक्षा कितीतरी अधिक संशोधन चालते. संरक्षण सामुग्री, शेतकी तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रात तो इवलासा देश भारतापेक्षा कितीतरी अधिक प्रगत आहे. इस्रायलने स्वभाषेच्या बाबतीत जे गेल्या ६० वर्षांत साध्य केले त्याच्या एक दशांशही आपण करू शकलो नाही हे वास्तव आहे.

ज्या-ज्या स्वाभिमानी देशांनी आपापल्या भाषा पुरेशा सक्षम केल्या त्या इंग्रजीतर देशांनी (जपान व इस्रायल सकट) विज्ञान, गणित अशा विषयांमध्ये भरपूर प्रगती केली. त्यातील अनेक देशांनी विज्ञान, गणितातील संशोधनासाठी नोबेल पारितोषके (बहुधा इंग्रजी भाषक देशांपेक्षा अधिक) मिळवली आहेत. आपण मात्र आमच्या भाषा या ज्ञानभाषा, उच्चशिक्षणभाषा, संवादभाषा होऊच शकत नाही असा गळा काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो व उंदरांसारखे पुंगीवाल्या इंग्रजीच्या मागे लागतो. त्याचा परिणाम एवढाच की सर्व क्षेत्रांत लायकी असूनही आपण इतर स्वकर्तृत्ववान देशांच्या मागेच राहतो. म्हणून शेवटी भारतीय वंशाच्या व्यक्तीने परदेशात केलेल्या शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या बळावर नोबेल पारितोषक मिळवले की “तो माणूस मूळचा भारतीय वंशाचाच आहे” असे म्हणून आपलीच पाठ थोपटून घेतो. तसं म्हटलं तर डार्विनच्या उत्क्रांतिवादाप्रमाणे आपण सर्वच अमिबापासून जन्माला आलेले आहोत. म्हणजे सर्व मूळ एकाच वंशाचे. मग “नोबेल पारितोषक मिळवणारा प्रत्येकच माझ्या वंशातला” असे म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घ्यायलाही काहीच हरकत नाही.

इंग्रजी माध्यमातील शिक्षणाबद्दल महात्मा गांधींनी दूरदृष्टीने काढलेले उद्गार आठवतात.

“The foreign medium has caused a brain fag, put an undue strain upon the nerves of our children, and made them crammers and imitators, unfitted them for original work and thought and disabled them from filtrating learning to the family or masses.” (Young India, 1-9-1921)

“परकीय माध्यमामुळे बालकांच्या मेंदूला थकवा येतो. त्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर अनाठायी ताण येऊन ती फक्त घोकंपट्टी करू लागली आहेत. परिणामी मूलभूत आणि स्वतंत्र संशोधन व विचारांकरता ती अपात्र बनली आहेत. त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या कुटुंबाला अथवा समाजाला उपयोग होत नाही.”

या उद्गारांत गांधीजींनी भारताच्या भाषिक यशापयशाची कुंडलीच मांडली होती असे म्हणावे लागेल. गांधीजींच्या या भविष्यवाणीचा प्रत्यय आपल्याला पावलोपावली येत आहे; पण तरीही आपण त्याच्या मूलभूत कारणांचा विचारच करीत नाही. ऍलोपॅथीमधील काही अयोग्य औषधांच्या दीर्घकालीन वापराने त्याचा दुष्परिणाम (side effects) वाढत जातो व दुखणे कमी करण्याचा चांगला परिणाम कमी होत जातो. पण तसे झाल्यावर ते औषध बंद करून दुसरे योग्य औषध देण्याऐवजी बर्‍याचदा डॉक्टर त्याच औषधाची मात्रा वाढवीत जातो. त्यामुळे दुखणे बरे न होता उलट इतर अपाय अधिकाधिक होतात; तसाच आपला भाषा धोरणाचा प्रयोग आहे.

बेंडाळेंच्या लेखातील जपानी अधिकार्‍यांचे “जगाची भाषा? कोणत्या जगाची भाषा? आणि ती जगाची भाषा असेल तर आमचा जपान देश त्या जगात नाही !!” हे बाणेदार उद्गार जपानी माणसाच्या खर्‍या अर्थाने स्व-तंत्र व स्वावलंबी असण्याचे द्योतक आहेत.

याच अमृतमंथन अनुदिनीमधील ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा लेख आपण वाचला का? इंग्रजांनी आपल्या भाषेबद्दलचा न्यूनगंड दूर सारून फ्रेंच भाषेची मानसिक अधिसत्ता झुगारून दिली नसती तर नंतरच्या काळात जगभर जिंकलेल्या प्रदेशांमध्ये व इंग्रजांच्या वसाहतींमध्ये (अमेरिका, ऑस्ट्रेलियासह) ते फ्रेंच भाषेचाच प्रसार करीत राहिले असते आणि आज फ्रेंच भाषा ही सध्याच्या इंग्रजी भाषेहूनही अधिक बलाढ्य झाली असती; ही गोष्ट आपण नाकारू शकतो का?

थोडक्यात सांगायचे म्हणजे ’भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ या म्हणीप्रमाणे ’न्यूनगंडग्रस्तापुढे अनंत समस्यांचा राक्षस’ आणि ’कणखर स्वाभिमान्यापुढे यशाच्या पायघड्या’ असेच भाष्य भारतीयांच्या भाषाधोरणाच्या बाबतीत करावे लागेल.

No comments:

Post a Comment